भुसावळ : राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त व प्रलोभणमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी अवैध दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड, विमल गुटखा आदींवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने भुसावळ विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या एक महिन्याच्या कालावधीत गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे २३ लाख ९३ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर एकुण ६५ असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती भुसावळ विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुजित कपाटे यांनी शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदीला प्रारंभ केला आहे. भुसावळ विभागात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, सावदा, वरणगाव, निंभोरा, रावेर विभागात पथकाने कारवाईला प्रारंभ केली आहे. रात्रीच्या गस्ती करीता विशेष पथक कार्यरत आहे. तसेच तापी पुर्णा क्षेत्रात बेटावर असलेले हातभट्टी केंद्रावर पथकाने होडीच्या सहाय्याने जावून गावठी हातभट्ट्या उध्वस्त केले.
तसेच काही ठिकाणी दिवसाला ५०० वाहनांची तपासणी केली जात आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक महिन्याच्या कालावधीत गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे २३ लाख ९३ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर एकुण ६५ असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई अधिक्षक डॉ.व्ही.टी.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक दुय्यम अधिकारी आय.बी. बाविस्कर, जवान अजय गावंडे, सरिता चव्हाण, नंदू नन्नवरे, सत्यम माळी आणि स्वप्नील यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान निवडणूक होईपर्यंत ही कारवाया सुरू राहतील अशी माहिती देखील भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांनी दिली आहे.