---Advertisement---
लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यातून समोर आला आहे. मालोद येथील 35 वर्षीय शेतकरी तरुणाला लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 2 लाख 54 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
दिनेश पाटील असे या तरुणाचे नाव असून काही मध्यस्थ आणि मुलीकडील नातेवाईकांनी लग्न ठरवून देतो, असे सांगत त्यांच्याशी संपर्क साधला. 2 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान लग्नाचा बनाव रचत आरोपींनी वेळोवेळी दिनेशकडून पैसे उकळले.
आरोपींनी संगनमत करून लग्न निश्चित झाल्याचा भास निर्माण केला आणि रोख रक्कम 2 लाख 30 हजार रुपये तसेच इतर खर्चासाठी 24 हजार रुपये घेतले. मात्र काही दिवसांनी लग्नाचा प्रकार बनावट असल्याचे लक्षात येताच दिनेश पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करत आहेत. सध्या कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, लग्नाचा प्रस्ताव ठरवताना मध्यस्थ आणि मुलीकडील व्यक्तींची पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.









