लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा देणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आज ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्यासोबत जळगाव विमानतळावर बंदद्वार चर्चा केली. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्याबरोबरच राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारणापासून अलिप्त असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी नाराजी पसरली होती. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत झाला. आता येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे जळगावच्या राजकारणात गतिमान हालचाली होत आहेत.
सुरेशदादा पोहोचले राऊतांच्या स्वागताला
ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत हे दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागताला चक्क माजी मंत्री सुरेशदादा जैन हे विमानतळावर पोहोचले. या वेळी खा. राऊत यांनी सुरेशदादांना मिठी मारली. त्यानंतर या दोघांमध्ये १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. मनपा निवडणुकीच्यादृष्टीने खा. राऊत आणि सुरेशदादा यांच्या भेटीबाबत राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहे.
सुरेशदादा आमचे मार्गदर्शक
या भेटीनंतर खा. संजय राऊत यांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, सुरेशदादा हे आमचे जुने मित्र असून त्यांच्याशी सदिच्छा भेट झाली. तर सुरेशदादा जैन हे आमचे नेते व मार्गदर्शक असून सुरेशदादा अजून थकलेले नाहीत, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी या भेटीनंतर दिली आहे. तसेच राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण सुरेशदादा जैन यांनी देखील दिले आहे.