---Advertisement---
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत तसेच नवीन कर्ज कधी मिळणार याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक कर्ज कधी मिळणार? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत नवीन पीक कर्जाचे वितरण सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काळात कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. हा अहवाल एप्रिलच्या मध्यापर्यंत अपेक्षित असला तरी त्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहवाल आल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
दरम्यान, यंदाचा खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेरणीपूर्व खर्चासाठी पीक कर्ज अत्यंत आवश्यक असते. मात्र कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँका नवीन कर्ज देण्यास सुरुवात करणार नसल्याने यंदा पेरणीच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्जमाफी प्रक्रियेसमोर अनेक मोठे आव्हान असून राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या, कर्जरचना, बँकांचा सहभाग आणि आर्थिक भार यांचा सखोल अभ्यास समितीला करावा लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेळ घेऊ शकते.
दरम्यान, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी प्रक्रिया गती घेईल आणि जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.









