Cancer Vaccine For Women : “आगामी काळात देशभरातील जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान पहिल्याच टप्प्यात झालं तर, उपचार करणं सोपं होईल. त्यावर नवीन लस तयार होत आहे. ज्यामुळं महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असून, आगामी सहा महिन्यात ती बाजारात येईल. ८ ते १६ वयोगटात ती घेतली तर, कॅन्सर सारख्या आजाराला थांबवण्यात यश मिळेल. याशिवाय त्यावरील औषधं देशात निर्माण करण्याचं काम सुरू आहे. बजेटमध्ये यासाठी भरपूर तरतूद करण्यात आली आहे. यासह विविध योजनांसाठीही बजेट अतिशय समर्पक झालय.” अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णात वाढ
“भारतात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये भारतात २ लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यात महाराष्ट्रातील महिलांची संख्या १७,७३६ होती. तर, २०२३ मध्ये देशात २.२१ लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. यात महाराष्ट्रातील महिलांची संख्या १९,५३० होती. इंडियन कॅन्सर सोसायटीनुसार, चालू दशकाअखेर भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दरवर्षी ५० हजारांची वाढ होऊ शकते. त्यामुळं ही लस फायदेशीर राहील.” असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
औषधांवरील सीमा शुल्कही माफ
३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांची हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाईल आणि कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जातील. कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमा शुल्कही माफ करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी ही माहिती दिली. महिलांच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांत लस उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ०८ ते १६ वयोगटातील मुली यासाठी पात्र असतील. केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले की, लसीवरील संशोधनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि चाचण्या सुरू आहेत. देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली असून केंद्र सरकारने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पावले उचलली असल्याचेही ते म्हणाले.
कर्करोगापासून महिलांचे संरक्षण करण्यावर भर
केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्कही हटवले आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांची रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाईल आणि रोग लवकर ओळखण्यासाठी ‘डेकेअर कॅन्सर सेंटर’ स्थापन केले जातील. ही लस कोणत्या कर्करोगाचा सामना करेल, असे विचारले असता जाधव म्हणाले की, स्तन, तोंडाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यास मदत होईल.
कर्करोगाची लस ही एक दिलासा देणारी
सध्याची आरोग्य केंद्रे आयुष केंद्रात रुपांतरित करण्याबाबत मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले की, रुग्णालयांमध्ये आयुष विभाग आहेत आणि लोक या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ते म्हणाले की, देशात अशी १२,५०० आरोग्य केंद्रे आहेत आणि सरकार त्यांची वाढ करत आहे. ही लस कर्करोगाबाबत एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. हे विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. या लसीमुळे अनेकांचे प्राण वाचवले जातील.