राजकारणात होणार मोठी उलथापालथ : उद्धव ठाकरे-शरद पवार भाजपसोबत जाणार तर शिंदे आणि अजितदादा…,’या’ माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

#image_title

मुंबई : केंदात भाजप एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं. भाजपने १३२ जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, केंद्रातील भाजप सरकार हे घटकपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे, केंद्रातील सरकार स्थीर ठेवण्यासाठी मोदींना एनडीएमधील घटकपक्षांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या चर्चांना अर्थ नसल्याचं स्वत: शरद पवारांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच,आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून, यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहाता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे . आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे , असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

भाजपला टोला

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून, भाजपची मोगलाई निती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपची निती आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचे की ते अति खूश असतात आणि जेव्हा ते अति खूश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.