..अन् पोलिसांच्या फोननं नातेवाईकांवर आभाळ कोसळलं

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात घन कचरा प्रकल्पाजवळ आज दुपारी ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आला. दरम्यान, त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

प्रमोद शेट्टी (वय-३३) असे मयताचे नाव असून तो दोन दिवसापासून बेपत्ता होता. तो मृतवस्थेत मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरु असून . खून कुणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

मेहरूण परिसरातील जय भवानी नगरात राहणारे प्रमोद सुरेश शेट्टी वय-३३ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामाला आहेत. दररोज ते दुचाकीने ये-जा करतात. दि.१० रोजी सकाळी ७ वाजता ते कामावर गेले मात्र दुपारी ५ वाजेपर्यंत घरी परतलेच नाही. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

प्रमोद शेट्टी यांच्या मालकाला फोन केला असता ते ४ वाजताच कामावरून निघाले असल्याची माहिती समोर आली. तसेच मानराज पार्क येथे त्यांना काही नागरिकांनी देखील पाहिले होते. दोन दिवस होऊन देखील मुलगा घरी न आल्याने सुरेश हरी शेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, निमखेडी शिवारात रेल्वे पुलाजवळील टेकडीवर सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता तो मृतदेह प्रमोद शेट्टी याचा होता. प्रमोदचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

भाडेकरूला ५ महिन्यापासून रूम खाली करण्यास सांगत होते परंतु तो घर खाली करत नव्हता. नातेवाईकांचा भाडेकरूवर संशय आहे. मयताच्या गळ्यावर चाकूने वार केलेले असून डोक्यात दगड घातलेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.