जळगाव : सध्या भारत-पाक तणावामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. अशातच जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत आढळलेल्या एका कारमधून टिक टिक आवाज येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने अलर्ट मोडवर येत कारची केली तपासणी. दरम्यान, कारमध्ये कुठलेही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नेमकं काय घडलं ?
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस स्थितीत आढळलेल्या एका कारमधून टिक टिक आवाज येत होता, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आला, त्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने अलर्ट मोडवर येत कारची केली तपासणी.
दरम्यान, तांत्रिक कारणामुळे कारमध्ये बीपचा आवाज आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, ही कार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच नो पार्किंगमध्ये कार उभी केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पालकमंत्र्यांनी घेतली दखल
या प्रकरणाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता कुठलीही संशयास्पद वस्तू कारमध्ये न आढळल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.