जळगाव : ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करत आहेत.
आमदार एकनाथराव खडसे यांना चार वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून धमकी आली असून या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पहिल्यांदा फोन करणार्याने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे एकनाथ खडसे यांना मारणार असल्याचे धमकावले. यानंतर, त्यांना अजून अन्य तीन म्हणजे एकूण चार फोनवरून धमक्या आल्या.
याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, “वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर दुसऱ्या वेळी फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही तुम्हाला सांगितलं तरीदेखील तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत. फोननंतर मी तक्रार दाखल केली आहे.”४ ते ५ वेळा खडसेंना फोन आला आहे. एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. त्याबाबत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे.