BSL Crime News : रेल्वेतून चक्क गांजाची तस्करी, प्रवाशांच्या सतर्कतेने १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ : रेल्वेतून होणारी गांजाची तस्करी यंत्रणांनी रोखत बेवारस असलेला तब्बल १२ किलो गांजा जप्त केला आहे. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये ही घटना १५ रोजी रात्री मलकापूर-भुसावळदरम्यान समोर आली. भुसावळ लोहमार्ग पोलिसात हा गुन्हा दाखल केल्यानंतर मलकापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला .

असे आहे गांजा प्रकरण
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या बी-३ या डब्यातील सीट नंबर ७ च्या खाली अज्ञाताने बेवारस बॅग ठेवल्याची माहिती प्रवाशांनी तिकीट निरीक्षकासह ऑनलाइन तक्रारीद्वारे यंत्रणेला कळवली. गाडीतील बॅग ताब्यात घेत तिची तपासणी केली असता त्यात १२ किलो गांजांची सहा पाकिटे जप्त करण्यात आली. एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल शुक्रवार, १५ रोजी रात्री ९ वाजता जप्त करण्यात आला.

ऑनलाइन तक्रारीनंतर कारवाई
अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग असल्याची तक्रार सतर्क रेल्वे प्रवाशांनी ऑनलाइन नोंदवली होती तसेच गाडीतील तिकीट निरीक्षक ललित मेश्राम यांनीदेखील यंत्रणेला माहिती दिल्यानंतर भुसावळात गाडी येताच पंचासमक्ष आरपीएफ व जीआरपी अधिकारी, कर्मचारी यांनी बॅग ताब्यात घेत, आरपीएफ कार्यालयात आणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमक्ष बॅग उघडली असता त्यात गांजा आढळला. एक लाख २० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. रेत्वे सुरक्षा बलाचे उपायुक्त अशोक कुमार यांच्या उपस्थितीत स्थानक निरीक्षक पी. आर. मीना, आरपीएफचे किरण मोरे तसेच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.