---Advertisement---
---Advertisement---
शहरातील स्वच्छतेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शहर साफसफाईच्या ठेक्याबाबत जळगाव महानगरपालिका आणि बीव्हीजी कंपनी यांच्यात मागील आठवड्यात झालेल्या करारानंतर, गुरुवारी कार्यादेश सुपूर्द करण्यात आला.
यामुळे आता १ सप्टेंबरपासून बीव्हीजी कंपनी शहर स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करणार आहे. वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई ठेक्याची मुदत संपल्यानंतर, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नवीन संस्थेला सोपवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.
या प्रक्रियेनंतर अखेर बीव्हीजी कंपनीला हे काम मिळाले आहे. कंपनीला मनपाकडून स्वच्छतेच्या नियोजनासाठी महिनाभराचा कालावधी दिला जाणार आहे. तोपर्यंत शहरातील स्वच्छता व्यवस्था वॉटरग्रेस कंपनीकडूनच हाताळली जाईल. दरम्यान, शहरात क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. मात्र, हे क्यूआर कोड स्कॅन करूनच कचरा संकलन होईल की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह आहे. १ सप्टेंबरनंतर बीव्हीजी कंपनीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावरच हे स्पष्ट होणार आहे.