Cabinet Meeting: मुख्यमंत्री फडणवीस 100 दिवसांचा रोड मॅप ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाची घेणार बैठक

Cabinet Meeting मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव वर्षाच्या प्रारंभी सक्रिय झाले आहेत. आगामी 100 दिवसांत राज्य सरकारतील सर्व  विभागांच्या  मंत्र्यांनी काय  काम करायचं, त्याची तयारी कशी असावी तसेच संबंधित विभागाच्या रोड मॅप काय असेल? याबाबत गुरुवार, २ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलविली आहे. या बैठकीला सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देणार आहेत.

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पुढील 100 दिवसांसाठी ठरवलेली टार्गेटस देणार आहेत. या टार्गेटसाठी शेतकऱ्यांचे नुकसान, बीडच्या सरपंचाची हत्या, मराठा-ओबीसी आरक्षण वाद आणि अवकाळी पावसाचे परिणाम यावर  चर्चाही केली जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विजयी ठरली आहे.  विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल असे जाहीर केले होते, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यासोबत, राज्यात आगामी काही महिन्यांत विविध स्तरावर निवडणुका होणार आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकींचा समावेश आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा  देखील करण्यात येणार आहे.  दरम्यान, जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नियुक्तीबाबत चर्चा होऊ शकते. याकरिता मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेऊ शकतात.

निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री म्हणून काम सुरू करणाऱ्या फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणारे संकेत दिले होते. त्यानुसार, मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात येईल आणि त्यावर आधारित पुढील निर्णय घेतले जातील.