बीड : समृद्धी महामार्गावर आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. कार मीडियन क्रॅश बॅरिअरला धडकल्यानंतर पेट घेतल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यु झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुसरा बीड टोलनाक्याजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार मुंबईहून अकोल्याला जात होती. महामार्गावरील चॅनेल क्रमांक ३१८.८ वर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती थेट मीडियन क्रॅश बॅरिअरला धडकली. धडकेनंतर बॅरिअरच्या पट्टीशी झालेल्या घर्षणामुळे कारने त्वरित पेट घेतला. यामध्ये कारमधील गणेश टेकाळे आणि राजू जयस्वाल यांचा होरपळून मृत्यू झाला.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
या अपघातात कारचालक अभिजीत चव्हाण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत गणेश टेकाळे आणि राजू जयस्वाल हे दोघेही मुंबईचे रहिवासी होते आणि अकोल्याला बहिणीच्या घरी जात होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील क्यूआरव्ही टीम आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारमधील मृतदेह बाहेर काढून त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
समृद्धी महामार्गावर या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली असून, वाहनचालकांनी गाडी चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.