Car Theft In Jalgaon: शहरात दुचाकींसह चोरट्यांनी आता महागड्या कार लंपास करण्याकडे वक्रदृष्टी वळविली असून, शहरातील उद्योजकांसह दोघांची सुमारे १२ लाखांची कार उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लांबविण्यात आली. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांच्या आधुनिक कार्यपद्धतीमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील गजानन हाउसिंग सोसायटी भागातील चर्चजवळील रहिवासी उद्योजक कौस्तुभकिशोर ढाके हे पत्नी भुवनेश्वरी ढाके, वडील किशोर ढाके, आई स्मिता ढाके व आजी उषा ढाके यांच्यासह वास्तव्यास आहेत त्यांचे एमआयडीसी भागात सोयो सिस्टिम्स ही सोलरची कंपनी आहे. वडिलांच्या नावे टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार (क्रमांक एमएच १९- सीएन ५०५०) आहे. ७ एप्रिलला सायंकाळी सातला कार घराशेजारी लावली. दुसऱ्या दिवशी ८ एप्रिलला सकाळी साडेआठच्या सुमारास कार दिसून आली नाही कौस्तुभ ढाके यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, मिळून आली नाही. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत कारचोरीची तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरम्यान, चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. समाजमाध्यमांतूनही कार पळविल्याची चित्रफीतही प्रसारित झाल्याने चोरट्यांच्या आधुनिक कार्यपद्धतीमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, शहरातील निमखेडी शिवारातील डी लाइट अपार्टमेंट-मधून १२ लाखांची कार चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी समोर आली आहे. हा प्रकारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निमखेडी शिवारातील डी लाइट अपार्टमेंटमध्ये नीलेश रमेश पाटील हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शासकीय ठेकेदार म्हणून ते काम करतात. सोमवारी (७एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कार (क्रमांक एमएच १९, सीझेड ८२००) अपार्टमेंटमध्ये लावली. कार चोरट्यांनी लांबविली. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी अपार्टमेंटमधून कार काढून पोलीस ठाण्यासमोरून थेट महामार्गावर नेत्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येते. घटनेची चित्रफीत कारमालक रमेश पाटील यांनी समाजमाध्यमांत प्रसारित केली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
Car Theft In Jalgaon : उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जळगावात दोन महागड्या कार लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांपुढे आव्हान
