---Advertisement---
धडगाव तालुक्यातील वेलखेडीचा पलासझाडीपाडा येथे खून प्रकरणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश उद्या पावरा (वय ५०, रा. वेलखेडीचा पलासझाडीपाडा, ता. धडगाव) यांचा पुतण्या बालगर पावरा याचा खून झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. फिर्यादी रमेश पावरा आणि त्यांच्या नातेवाइकांनी हा गुन्हा मागे न घेतल्याने आरोपींना याचा राग होता.
१५ जुलैला सकाळी अकराला रमेश पावरा आणि त्यांचा मुलगा नाहारसिंग पावरा हे बाजार करून घरी परत येत होते. त्यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर पिट्या शिलेदार पावरा, गजमल जामसिंग पावरा आणि बहादा रेहज्या ऊर्फ हुकल्या पावरा (तिघेही रा. वेलखेडीचा पलासझाडीपाडा, ता. धडगाव) यांनी त्यांचा रस्ता अडवला.
आरोर्पीनी रमेश पावरा आणि त्यांच्या मुलाला धमकावत सांगितले की, “तुम्हाला तुमच्या घरी राहायचे असेल तर तुम्ही आमच्याविरुद्ध केलेली केस मागे घ्या, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही. बालगर रूपसिंग पावराचा तर फक्त पाय तोडला होता, तुमचे तर हातपाय व डोके पण तोडू.” अशी धमकी देत आरोपींनी रमेश पावरा आणि त्यांच्या मुलाला हाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली.
याप्रकरणी रमेश उदया पावरा यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनात हवालदार धीरसिंग वळवी तपास करीत आहेत.