मुक्ताईनगर : महायुतीत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार चंद्रकांत पाटील हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यात व खडसे परिवार यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. हा वाद असला तरी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेला वाद बाजूला ठेवून, आपण पक्ष आदेश पळून त्यांचा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यापूर्वीच ते मी त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हणतं असले तरी मी भाजपाची कार्यकर्ता असल्याने महायुती म्हणून मी त्यांचा प्रचार करणार असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी आव्हान दिले आहे.
महायुतीत होणारी बंडखोरी रोखण्यासाठी ना. गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. या बंडखोरीसंदर्भांत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. मुक्ताईनगर मतदार संघाने ननंद भावजईचा समिकरण यापूर्वीदेखील पहिले आहे. रोहिणी खडसे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघी आपापल्या पक्षाचे काम करु असेही रक्षा खडसे म्हणाल्या. महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवितांना तुतारी चिन्हावरून प्रचंड मतांनी विजय संपादन करतील, असा विश्वास मुलीच्या विजयाबाबत जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांच बालेकिल्ला मानला जातो. परंतु, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना पराभूत केले होते. रोहिणी खडसे या पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.
जेष्ठ नेते तथा राष्ट्र्वादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याबाबत देखील माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले. यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांनी कुठल्या पक्षात जावं हा नाथाभाऊंचा व्यक्तिगत निर्णय असून मी माझ्याबद्दल बोलू शकते. परंतु, नाथाभाऊंच्या निर्णयाबाबत नाथाभाऊ सांगू शकतील असे रक्षा खडसे म्हणाल्या.