अडावद, ता. चोपडा । येथून जवळ असलेल्या चांदसणी-कमळगाव (ता. चोपडा) येथील जागृत देवस्थान श्री काळभैरव महाराजांच्या यात्रेला आज (दि.६ डिसेंबर) पासून प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवास जवळपास पाच लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या यात्रोत्सवांच्या सुरुवातीला येणाऱ्या या यात्रेला अडावदसह परिसरात अनन्य साधारण महत्व आहे. दोन दिवस चालणाऱ्या श्री काळभैरवांच्या यात्रोत्सवात महाराष्ट्रसह जवळच्या मध्यप्रदेश, गुजरात राज्यांतून मोठ्या संख्येने भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात. यावर्षी जवळपास पाच लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
‘नवसाला पावणारा देव’ अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने दरवर्षी हजारो भविकभक्त येथे नवस फेडण्यासाठी येत असतात. नागपंचमी तथा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीपासून दोन दिवसीय चालणाऱ्या या यात्रेत पाळणे, खेळणी, हलवाई दुकानदार यांची मोठी रेलचेल असते तसेच लहान मोठ्या व्यवसायातून दोनच दिवसात कोटींची उलाढाल या यात्रेत होत असते. पंचक्रोशीतील रुखनखेडा, पिंप्री, मितावली, पुनगाव, देवगाव, पारगाव या गावांसाठी ही यात्रा जणू दिवाळी, दसऱ्याचा सणचं असतो.
दरम्यान, अडावद ते चांदसणी-कमळगाव या अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना फारच मनस्ताप सहन करावा लागतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चोपडा, यावल, भुसावळ, जळगाव, अमळनेर, एरंडोल या आगारांमार्फत प्रवाशांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात येते. यात्रेसाठी चांदसणी-कमळगाव येथील संस्थानचे पदाधिकारी, संचालक तसेच ग्रामस्थ दोन दिवस अविरत अहोरात्र परिश्रम घेत असतात.