जळगाव । बंगालच्या उपसागरात ‘फेंगल चक्रीवादळ’ प्रभावामुळे वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम हवामानावर झाला आहे. परिणामी जिल्ह्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ‘रब्बी’चा हंगाम संकटात सापडण्याची भीती आहे.
धास्तावलेले शेतकरी पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करत आहेत. एक-दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बीतील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्यात जळगावसह परिसरातील कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव आला आहोत. मात्र यानंतर रविवार व सोमवारी त्यात किंचित वाढ होऊन किमान तापमान १४ अंशांवर स्थिरावले होते.
मात्र ढगाळ वातावरण तयार होऊन मंगळवार, ३ डिसेंबर रोजी पहाटे किमान तापमान १८.८ अंशांवर पोहोचले. त्यामुळे या बदलत्या वातावरणामुळे ‘रब्बी’चा हंगाम संकटात सापडण्याची भीती आहे.
पिकांची कशी घ्याल काळजी ?
हरभरा
ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जेविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकातील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात प्रति एकरी ०२ कामगंध सापळे व १० पक्षी थांबे उभारावेत. रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.४ ग्रॅम किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
हळद
ढगाळ वातावरणामुळे हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२% डायफेनकोनॅझोल ११.४ एस सी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४% मॅनकोझेब ६४% २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
कापूस
ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात बॉड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम १२.६% लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ६ मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
गहू
बागायती गहू उशीरा पेरणी १५ डिसेंबर पर्यत करता येते. उशीरा पेरणीसाठी व कमी पाण्यावर येणाऱ्या फुले नेत्रावती व फुले सात्वीक या वाणांची निवड करावी.