धुळे : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या काम पूर्ण झालेले नाही. परंतु, संबंधित ठेकेदाराने धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोलवसुली सुरु केली आहे. यातच टोलनाका चालक या भागातील ग्रामस्थांबरोबर वाहनधारकांसोबत हुज्जत घालत आहेत. याकडे आपण लक्ष द्यावे अन्यथा परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांसह वाहनधारकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार राम भदाणे यांनी दिला आहे. यासंदर्भात आमदार भदाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे महाप्रबंधक संजय यादव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गजानन पाटील, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, मोहन भदाणे, जितेंद्र बंब, प्रभाकर पाटील, जुनवण्याचे सरपंच रावसाहेब खैरनार, बोरविहीरचे सरपंच किरण ठाकरे, भय्या सोनवणे, अनिल गवळी, टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. भदाणे यांनी टोलनाका संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप या अपूर्ण आहे. महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यासह साइडपट्ट्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यासोबतच काही भागात पुलांची, उड्डाणपुलांसह सर्व्हिस रोडची कामेही अपूर्ण आहेत. तरीही संबंधित ठेकेदाराने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरविहीर येथे टोलनाका सुरु केला आहे. तसेच वाहनधारकांकडून वसुली देखील सुरु केली आहे.
याशिवाय त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही टोलनाका परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थांसह वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. संबंधित टोलनाकाचालक हा गुंड प्रवृत्तीचा असून प्रवाशी नागरिकांशी अतिशय उद्दामपणे वागत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशी नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपण या प्रश्नी लक्ष घालावे. ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत, टोलनाक्याजवळच्या गावांतील वारंवार ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, टोलनाक्याजवळील २० किलोमीटर अंतरातील गावांतील वाहनधारकांना कमीत कमी टोल आकारावा, वाहनधारकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना द्याव्यात, धुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधी दिवसभर मतदारसंघातील कामांनिमित्त प्रवास करत असतात, त्यांनाही टोलमाफी मिळावी, आदी मागण्याही आमदार भदाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केल्या.