---Advertisement---
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती जाहीर केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही आपल्याच जागा मित्रपक्षाला दिल्या जात असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांना घेराव घालत थेट प्रश्न विचारला आहे.
युतीच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवून ‘युती तोडा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. “आम्ही पक्षाची संघटना उभी केली, मग आमचे अस्तित्व काय ?” असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत सिल्लोड वगळता भाजप २७ तर शिवसेना शिंदे गट २५ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. या जागावाटपाला भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, भाजप मोठा पक्ष असतानाही अनेक ठिकाणी सक्षम उमेदवारांना डावलण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेतही स्वबळावर लढण्याची ताकद आमच्यात आहे, मग युतीची गरज काय, असा सवाल कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनपा निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. मंत्री अतुल सावे कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी वातावरण तणावपूर्ण आहे.
या प्रकारामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली असून, छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.









