मुबंई : शिवजयंतीच्या पवित्र दिवशी द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाच्या टीमने महान मराठा सम्राटाला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. या निमित्ताने या ऐतिहासिक चित्रपटाची पहिली प्रतिमा प्रदर्शित करण्यात आली. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे. कांतारा फेम रिषभ शेट्टी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांसमोर आले असून, त्याने इंटरनेटवर उत्सुकता निर्माण केली आहे.
या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भगवती भवानीमातेच्या समोर उभे असलेले दिसतात. हा देखावा केवळ ऐतिहासिक वैभवच नव्हे, तर भक्तीमय ऊर्जा व्यक्त करणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट एक भव्य ऐतिहासिक गाथा उलगडणार याची चाहूल लागली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंग यांनी ही आदरांजली अर्पण करत लिहिले, “जय भवानी ! जय शिवाजी ! हर हर महादेव !! संपूर्ण खंडाचा इतिहास बदलणाऱ्या महान योद्ध्या राजाच्या ३९५व्या जयंतीनिमित्त, द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला लुक सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या पराक्रम, सन्मान आणि स्वराज्याच्या अद्वितीय गाथेला चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्याचा मान आम्हाला मिळत आहे. २१ जानेवारी २०२७ रोजी हा भव्य चित्रपट संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार!”
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, कानडी, तेलगु, तमिळ, बंगाली, मल्याळम ह्या भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ पहिल्या लुकमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.