विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली ‘शुक्ला’च्या निलंबनाची घोषणा

कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याबद्दल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शुक्ला याने देशमुख कुटुंबीयांना गुंडांमार्फत लोखंडी रॉडने मारहाण केली होती, आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी शुक्ला फरार झाला होता, ज्यामुळे लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्ला याच्या निलंबनाची घोषणा केली.

शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसांवर अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे अधिक नाराजी निर्माण झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही” आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान दिलं जाणार नाही. त्यांनी असं सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीला काय खायचं याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे, आणि कोणालाही घर नाकारण्याचा अधिकार नाही.

तसेच, फडणवीस यांनी आपल्या भाषणात विविध संस्कृतीं आणि परंपरांच्या महत्त्वावर जोर दिला. त्यांनी सांगितलं की, आपल्या देशाच्या वैविध्याला टिकवून ठेवणं हे आपली जबाबदारी आहे, आणि मराठी अस्मितेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही.

दरम्यान ,  या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याने पोलिसांच्या ताब्यात आत्मसमर्पण केले आहे. शुक्ला याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यानुसार, अखिलेश शुक्ला आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये शेजारधर्मावरून वाद झाला होता, आणि या वादात भाषेचा मुद्दा न करता, तो शुद्ध शेजारीक वाद होता, असा दावा शुक्ला यांनी केला आहे.