जळगाव : जळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करून धावपट्टी वाढीसह अन्य पयांची उपाययोजनांची तातडीने कामे हाती घ्यावीत. अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक प्रशासनाला केल्या आहेत, विमान वाहतूक हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जळगाव येथील विमानतळ विस्तार आणि सोयी-सुविधांसंदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी विमानतळ प्राधिकरणमंत्र्यांची भेट घेत जळगाव विमानतळ सेवेसाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने सोमवारी (६ जानेवारी) मुंबई मंत्रालयातील सह्याद्री अतिथिगृहात सहकार विभाग आणि विमानतळ प्राधिकरणासह जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची यांची बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जळगाव येथील विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत तयार करावी, यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जळगाव विमानतळाच्या धावपट्टी वाढीसह अन्य पर्यायी उपाययोजनांची तातडीने कामे हाती घेण्यात यावीत. अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.
बैठकीला केंद्रीय सहकार आणि नागरी विम ान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव रुबिना अली. असंगबा चुबा येवो, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी विम नितळ प्राधिकरण पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यकारी अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
विमान वाहतूक हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विमान वाहतूक सेवा हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र असून, केंद्र आणि राज्य शासनाला यासाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी-सुविधा करणे आवश्यक आहेत. त्यानुसार विमान वाहतूक सेवांमधील पायाभूत सोयी-सुविधांचा विस्तार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.