जळगाव: गेल्या ११ दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अत्यवस्थ बालिकेचा मंगळवार (२२) सायंकाळी मृत्यू झाला.
अमळनेर तालुक्याच्या एका गावातील ही चौदा वर्षीय बालिका गेल्या काही दिवसांपासून बाल सुधार निरीक्षण गृहात वास्तव्यास होती.शनिवार (१२) रोजी निरीक्षणगृहात असताना तिने गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्याने तिला कर्मचार्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सकाळी ११.१५ वाजता उपचारासाठी दाखल केले.
अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. बाल सुधार गृहातील कर्मचारी बालिकेच्या प्रकृतीवर रूग्णालयात लक्ष देवून होते. तर बालिकेचा भाऊ याठिकाणी तिची काळजी घेण्यासाठी थांबला होता. बालिकेचे आई वडीलही रूग्णालयात येऊन तिच्या प्रकृतीबद्दल डॉक्टर,परिचारिका यांच्याकडून माहिती जाणून घेत होते.
डॉक्टर-परिचारिकांची आपुलकी
गेल्या अकरा दिवसात उपचारात ती कोणाशीही बोलू शकली नाही. किंवा पूर्ण डोळे उघडून तिने कोणाला पाहिले नाही. कुटुंबातील व्यक्ती तिच्याजवळ आले असता ती ओळखत नव्हती.दहा दिवसांपासून ती उपचाराला प्रतिसाद देत होती. त्यामुळे ती लवकर बरी होईल,असा कुटुंबियांना विश्वास वाटत होता. मंगळवार २२ रोजी सायंकाळी तिची प्रकृती अधिक गंभीर झाली.डॉक्टर तसेच परिचारिका यांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले.तिच्याकडून उपचाराला कोणताही प्रतिसाद न मिळू शकल्याने अखेर मृत्यूने तिला गाठले.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकार्यांनी तिची खबर दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतर बाल सुधारगृह जिल्हा परिविक्षा निरीक्षणगृह प्रशासनाने तत्काळ संपर्क साधून मृत बालिकेच्या वडिलांना माहिती दिली.बुधवार (२३) रोजी सकाळी बालिकेचे वडिल, गावाचे ग्रामपंचायत पदाधिकारी व काही नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात धाव घेतली. दुपारी सपोनि मिरा देशमुख यांनी मृत बालिकेचा पंचनामा केला. यावेळी निरीक्षणगृहातील महिला अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. शवविच्छेदन झाल्यानंतर बालिकेचा मृतदेह ताब्यात घेत नातेवाईक गावाकडे रवाना झाले.
तणावातून उचललेले टोकाचे पाऊल
नातेवाईकांच्या बोलण्यातून धक्कादायक माहिती समोर आली. गावातील एक मुलगा या बालिकेला त्रास देत तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा मनसुबा होता. यामुळे बालिकासह कुटुंबातील सदस्य भीतीने ग्रस्त होते. कुटुंब गावाला जात असल्याने बालिकेला बालगृहात वास्तव्यासाठी तिच्या पालकांनी निर्णय घेतला होता. परंतु मानसिक आघात सहन न झाल्याने बालिकेने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसल्याचे दिसून आले. सुधारगृह, रूग्णालयातील स्टॉप तसेच पोलिसांचे खूप सहकार्य लाभले, अशी भावना बालिकेच्या वडिलांनी व्यक्त केली.