---Advertisement---
Chopada News: दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्ज मागणी आर्जावर खोट्या सह्याकरुन फसवणुक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक झालेले सागर ओतारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तीन ते चार महिने होऊनही अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सागर ओतारी यांनी चोपडा येथे आमरण अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज तीसरा दिवस आहे.
या फसवणूक प्रकरणी सागर ओतारी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याविरोधात बँकेने देखील न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर, मा. उच्च न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर या प्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याची वस्तूस्थिती आहे.
तक्रारदार सागर ओतारी यांनी या प्रकरणी दि. 26 एप्रिल 2025 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. तरी अद्याप गुन्हा नोंदविला गेलेला नाही. तसेच आपल्या विरुद्ध फिर्याद दाखल होऊ नये म्हणून बँकेने देखील मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन क्र. 798/2025 दाखल केली होती. त्यावर दि. 24 जून 2025 रोजी मा. उच्च न्यायालयात सुनावणी होत न्यायालयाने बँकेचा अर्ज फेटाळत असल्याचे सांगताच बँकेतर्फे वरिष्ठ अॅड. एस. बी. देशपांडे व अॅड. तपन संत यांनी याचिका मागे घेतल्याने मा. उच्च न्यायालयाने सदर याचिका रद्द केली. असे असताना देखील पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप सागर ओतारी यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळेना
या फसवणूक प्रकरणी तपास अधिकारी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तपास पूर्ण केला आहे. त्यानुसार त्यांनी तपास अहवाल उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे पाठवत बँकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्याबाबात त्यांनी वारंवार लेखी पत्र दिले आहे. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी मिळत नसल्याची स्थिती आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जनसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्याबाबात होत असलेल्या दिरंगाईबाबत आणि बँक प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध सागर ओतारी यांनी 14 ऑगस्ट 2025 पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, श्री. ओतारी यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, उपोषण स्थळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून आपला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, या प्रकरणी बँकेची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी दै. तरुण भारतने भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.