Chopda Crime News: राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस आल्या आहेत. बदलापूर येथील दोघं अल्पवयीन मुलींवर अत्यचाराची घटना ताजी असताना जळगाव जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
बदलापूर प्रकरणामुळे संपुर्ण राज्यात खळबळ अडत आजही हे प्रकरण चर्चेत आहे. ही घटना ताजी असताना पुणे येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाने सहा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. तर पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. राज्यात सतत घडत असलेल्या या घटना लक्षात घेता महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकाराने अडावद परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पीडित अल्पवयीन मुली आणि आरोपी एकाच गावातील आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटरसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात एक विधी संघर्षीत 17
वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या 19 वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही पिडीत मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपिंनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात अत्याराचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजु थोरात, पोहेकॉ संजय धनगर, सतीश भोई हे करीत आहेत.