Chopda Murder News: तरुणाचा निर्घुण खून ; महिनाभरातल्या तिसऱ्या खूनाच्या घटनेने अडावद हादरले

अडावद, ता.चोपडा वार्ताहर : येथील लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आज दि. १ रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे अडावदसह परिसरात खळबळ उडाली आहे.

अडावद पो. स्टे. हद्दीत महिनाभरातच झालेल्या या तिसऱ्या खूनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा खून कशामुळे झाला असावा याबाबत नानाविध चर्चांना उधाण आले आहे. या तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेत पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, येथील भगवान नगरमध्ये मोकळ्या जागेवर एका तरुणाचा खून झाल्याची वार्ता आज सकाळी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती पोलीसांना मिळताच अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजु थोरात, भरत नाईक, संजय धनगर, सतीश भोई, विनोद धनगर, भुषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत, चंद्रकांत कोळी, प्रवीण महाजन, संजय शेलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले. काही वेळातच मयताची ओळख पटून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सदर तरुण हा लोखंडे नगरमधील बापू हरी महाजन (वय- ३५ )असल्याचे उघडकीस आले आहे.

या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री बापूचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घून खून केल्याचे समोर आले आहे. मयताचे शव विच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मयताच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

श्वान पथकास पाचारण
घटनेचा मागोवा घेण्यासाठी सपोनि प्रमोद वाघ यांनी जळगाव येथील श्वान पथकाला पाचारण केले. काही वेळातच हे. काँ. विनोद चव्हाण, पो.ना. प्रशांत कंखरे हे ‘चॅम्प’ नामक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने घटनाक्रम कसा घडला तो माग दाखविला. यात पोलिसांना खूनाबाबत काही धागेदोरे मिळतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. कविता नेरकर, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा आढावा घेतला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे, निलेश सोनवणे, प्रदीप चावरे, दीपक माळी, महेश सोमवंशी व ठसे तज्ञ किरण चौधरी, रफिक शेख हे दाखल झाले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे घेतले व तपासाला गती दिली. या रहस्यमय खूनाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

रहस्यमय गंभीर घटनांचे क्षुल्लक कारणे
महिनाभरात झालेल्या घटना क्रमामध्ये पहिला खून फक्त ‘येथे गांजा का पितात’ एवढ्या बोलण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झाला. यात चौघांनी एकाचा निर्घृणपणे खून केला होता. दुसरा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्रयस्थ एकाने महिलेचा निर्दयीपणे खून केला होता. त्यामुळे आजच्या खुनाच्या घटनेतही अज्ञातांनी तरुणाचा निर्घृणपणे खून केला याचे रहस्य काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.