---Advertisement---
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी ढगाळ हवामान, सकाळ-संध्याकाळची थंडी आणि दुपारचा उकाडा यामुळे नागरिकांना एकाच दिवसात तीन ऋतूंचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असली तरी महाराष्ट्रात मात्र तापमानात सतत चढ-उतार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसात तापमानाची स्थिती :
जळगावमध्ये रविवारी किमान तापमान १२.६ अंश व कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस होते, तर सोमवारी किमान तापमान ११.८ अंशांवर घसरले आणि कमाल तापमानही २८.४ अंशांपर्यंत खाली आले. छ. संभाजीनगर मध्ये किमान तापमान ९ अंश तर कमाल तापमान २४ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील हा बदल अधिक तीव्र झाला असून, दुपारी उन्हाचे चटके तर सकाळी-संध्याकाळी गारठा जाणवत आहे. उत्तर-पश्चिमेकडून पाकिस्तान व लगतच्या देशांकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून, त्यामुळे काही भागांत तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान विभागानुसार पुढील २४ तास हा गारठा कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना अजून गारठ्याचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात कुठे किती तापमान ? वाचा ⬇️
राज्यात निफाड येथे ७.९ अंश, गोंदिया येथे ९.८ अंश, धुळे येथे १० अंश, जळगाव येथे ११.८ अंश, छ. संभाजीनगर ९ अंश, पुणे १६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे. ही नैसर्गिक स्थिती पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून, बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बदलत्या ऋतूंच्या या खेळात पुढील काही दिवस हवामान कसे वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









