---Advertisement---
जळगाव : गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल होत थंडी गायब झाली होती. मात्र दोन दिवसापासून जिल्हयात थंडीने ‘कमबॅक’ केले असुन पारा तब्बल ९ अंशावर आला आहे. गेल्या दोन दिवसात पारा ५ अंशीनी घसरल्याने जिल्हावासीयांना हुडहुडीची अनुभूती येत आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात थंडीच्या लाटेने प्रभाव दाखवल्यानंतर काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आणि त्याचा परिणाम म्हणून रात्रीच्या तापमानाचा पारा ९ अंशांवरून थेट १७अंशांपर्यंत पोहचला होता.
परिणामी थंडी जवळपास गायब झाली होती. जिल्ह्याच्या वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीने २९ नोव्हेंबर रोजी रात्री जोरदार पुनरागमन केले आहे.
तापमान वाढल्यामुळे जिल्ह्यात उकाडा देखील वाढला होता. पण आता पुन्हा थंडीचा कडाका सुरू झाला आहे. २८ नोव्हेंबर रोजी जळगाव शहराचे तापमान १४ अंश सेल्सिअस होते, ते २९ नोव्हेंबर रोजी रात्री थेट ५ अंशांनी घसरून ९ अंश सेल्सिअसवर आले आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे.
उत्तरेकडील थंड वारे सक्रिय
थंडीची लाट गायब होण्यामागे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होते. परंतु, आता हे वातावरण निवळून जिल्ह्यात कोरडे हवामान तयार झाले आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे.









