जळगाव : जिल्ह्यातील तापमान बदलाचे निरीक्षण रोचक आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जाणवणाऱ्या थंडीचा जोर कमी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी ९ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान रविवारी १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. फक्त दोन दिवसांत ६ अंशांची वाढ होणे हवामान बदलाचे उदाहरण आहे. यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी थंडी पूर्णतः ओसरल्याचे म्हणता येणार नाही.
आठवड्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा ८ अंशावर आल्याने हुडहुडी भरणारी थंडी जळगावकरांना जाणवत आहे. जळगावचे किमान तापमान ८.४ अंशापर्यंत होते. तर कमाल तापमान २९ अंशापर्यंत आले होते. शुक्रवारी किमान तापमान ९.३ अंशावर होते, मात्र शनिवारी यात वाढ होऊन किमान तापमान १२ अंशावर पोहोचले. कमाल तापमानही ३० अंशावर पोहोचले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासांत पुढे सरकणार आहे. यामुळे पूर्व-ईशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसांत राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. यासह जळगाव जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरीची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यासह जिल्ह्यात आर्द्रता वाढणार असून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरामुळेच थंडीवर परिणाम…
जळगाव जिल्ह्याला अरबी समुद्र हा बंगालच्या उपसागरापेक्षा जवळ आहे. मात्र, जळगाव जिल्ह्याच्या वातावरणावर अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागराचा अधिक परिणाम होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे मध्यंतरी थंडी गायब झाली होती. आतादेखील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यातील थंडीवर परिणाम झाला. यासह गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच अधिक पाऊस होत आहे.