जळगाव । उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगावसह राज्यात बोचरी, गुलाबी थंडी जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने जळगावसह चार जिल्ह्यात तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान ११ अंशांवर गेले आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडीचा मागमूस नव्हता. मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान घसरू लागले आहे. आठवड्यात थंडीची लाट आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जळगाव जिल्ह्याचे दिवसाचे तापमान ३० अंशांवर आहे, तर रात्रीचे तापमान ११ अंशांवर आले आहे. त्यामुळे रात्रीचा पारा कमालीचा कमी झाल्याने लहान बाळांना गरम कपड्यासह त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘या’ जिल्ह्यांनाही थंडीच्या लाटेचा इशारा
हवामान खात्याने जळगावसह पुणे, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यात थंडीची लाट अधिक तीव्र राहील, असा इशारा दिला आहे. राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना थंडीपासून बचावासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.