---Advertisement---
जळगाव : महापालिकेच्या १९ प्रभागांसाठी प्रारूप आरक्षण सोडत काढण्यात आली असून दि. ११ व दि. १७ सोमवार रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश देत अंतिम आरक्षणासाठी अहवाल पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव प्रदिप परब यांनी दिले आहेत.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने मान्य केली असून आज दि.१९ रोजी सदर प्रारूप आरक्षण महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
त्यानंतर २५ नोव्हेंबर पर्यंत हरकती व सुनावण्या मागविण्यात येणार असून त्यावर २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेतील.
यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. आधी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत प्रभाग ४ ब पूर्वी ओबीसी खुला होता. या प्रभागातून २०१८ मध्ये माजी महापौर भारती सोनवणे या लढल्या होत्या.
आता हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने, सोनवणे यांना पुन्हा निवडणूक लढवण्यास संधी मिळाली आहे किंवा भाजपला येथे महिला उमेदवार द्यावी लागेल. प्रभाग ८ अ यापूर्वी ओबीसी खुला होता आणि येथून मनोज चौधरी यांनी निवडणूक लढवली होती.
आता हे आरक्षण ओबीसी महिलांसाठी झाल्याने चौधरी यांना आपला प्रभाग बदलावा लागणार आहे. प्रभाग ६ अ, ७ अ माजी महापौर सीमा भोळे यांचा आणि १७ अ या तीनही ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण कायम राहिले आहे. यामुळे या प्रभागांमधील राजकीय समीकरणे बदललेली नाहीत.
उद्या जाहीर होणार मतदार याद्या!
आज, बुधवारी सायंकाळीच मतदार याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. महापालिका इमारतीत दोन रुपये प्रति प्रत या दराने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी – २० नोव्हेंबर. हरकती, सूचनांसाठी अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्धी – ५ डिसेंबर. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्धी – ८ डिसेंबर. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धी- १२ डिसेंबर.









