सिमालढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

बेळगाव: ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सिमालढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही आणि साहित्यिक पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.

एक कट्टर कम्युनिस्ट नेता, उत्तम वक्ते, आणि लेखक म्हणून कॉम्रेड कृष्णा मेणसे यांची ओळख होती.  त्यांनी कामगार वर्गाच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने राबवली. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. बेळगाव आणि सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला.

त्यांच्या निधनाने कष्टकरी वर्गासाठी काम करणारा एक महत्त्वाचा नेता गमावला आहे. त्यांच्यावर अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पडला. त्यांच्या कार्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले होते.

कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे साहित्यिक योगदान देखील महत्त्वाचे होते. “गोठलेली धरती पेटलेली मने” हे त्यांच्या प्रवास वर्णनाने वाचनप्रेमींमध्ये मोठे स्थान निर्माण केले. “साम्यवादी” या साप्ताहिकाचे संस्थापक असलेल्या कॉ. कृष्णा मेणसे यांना राष्ट्रवीर कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात प्रा. आनंद मेणसे, ॲड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, नीता पाटील आणि नातवंडे असा परिवार आहे. कॉम्रेड मेणसे यांचा अंत्यसंस्कार सोमवारी रात्री आठ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत करण्यात आला.