मनपाच्या महासभेत महाभारतात शिरले रामायण

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील विकासकामे थांबली असतांनाच, महासभा दोन – दोन महिन्यांनंतर होत असतांनाच, त्यातही सभा तहकूब होणे म्हणजे विकास कामांविषयी कोणीही गंभीर नसल्याचे दिसत असल्याची चर्चा २१ रोजी शहरात होती.

महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे असतांनाच महासभेत राजकारण होणे अपेक्षित नसल्याचे मत राजकारणातील जाणकारांनी दिले आहे. यामुळे शहरवासीयांचे नुकसान होत असून विकास खुंटला जात असल्याची देखील चर्चा आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या २१ रोजी झालेल्या महासभेत सभा सुरु होण्या पूर्वीच गोंधळ झाला. सभेत पिंप्राळा परिसरातील नगरसेवक मयूर कापसे यांनी त्याभागातील निविदा मक्तेदारांना घेण्यापूर्वीच लिपिकाने मला विचारल्याशिवाय देऊ नये असे आदेश उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्याची ऑडियो क्लिप त्यांनी सभागृहात ऐकवून दाखवली. त्यावरून महानगरपालिकेत हुकूमशाही आहे की लोकशाही याबाबत त्यांनी विचारणा केली. नगरसेवक कापसे यांनी याबाबत महाभारतातील एक दृष्टांत सांगत हस्तिनापूरचे राजा वारल्यानंतर धृतराष्ट्राने राजा होण्याची मनशा जाहीर केली. त्यावर पितामह भीष्म यांनी सत्ता हि उपभोगणारी वस्तू नसून सेवा करण्यासाठी असते, पण मनपा मध्ये सत्ताधारी सत्तेचा उपभोग घेता आहे, हा प्रकार शहराच्या दृष्टिकोनातून घटक असल्याचे सांगितले. कारण सत्तेत अहंकार आला म्हणजे सर्वच संपते असे कापसे यांनी सांगितले. यावर नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रावणाचा डिलकीला अहंकारामुळे सर्वनाश झाला. असे म्हणताच रावण रामापेक्षाही महाशक्तिशाली आणि बलाढ्य असल्याचे उपमहापौरांनी सांगितले. यावरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी रामापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही म्हणत जय श्री रामच्या घोषणा सभागृहात दिल्या. तर दुसरीकडे या वक्तव्यावरून उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा निषेध व्यक्त करत, कुलभूषण पाटील यांनी यापुढे महापौरांच्या शेजारी न बसता सभागृहात नगरसेवकांच्या बाकांवरच बसावे अन्यथा यापुढे आंदोलनाचा पवित्र हाती घेतला जाणार असल्याचा ईशारा ऍड शुचिता हाडा यांनी दिला.

यावर सभेत जेष्ठ नगरसेवक नितीन लद्धा यांनी सरळ महापौरांच्या टेबलाजवळ जाऊन चर्चा केली. त्यानंतर महापौरांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. यानंतर उपमहापौर यांनी मी रावण हा बलाढ्य होता असे म्हटले. त्याची तुलना मी भगवान रामाशी केली नाही. शिवाय लिपिकाला बोलावून निविदा अबो पद्धतीने टेंडर भरू नये असे सांगितले. कारण त्यात २०% कमिशन घेतले जाते. या महासभेत ५८ कोटींच्या विकास कामांचा विषय होता, पिंप्राळा भागातील शिवस्मारकाच्या विषय होता. जर हा विषय मंजूर झाला असता तर भाजप व कापसेंना श्रेय घेता आले नसते म्हणूनही गोंधळ करून सभा बंद पाडल्याचा कट रचल्याचा आरोप उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला.