---Advertisement---
Dhule News : शहरातील विविध भागांत काही महिन्यांपासून विशिष्ट घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडून दंगल घडेल, यासाठी चिथावणीचे प्रकार सुरू झाले आहेत. काही महिन्यांपासून हिंदू बांधवांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांनी साऱ्यांचीच चिंता वाढली आहे.
या प्रकारांमुळे शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची गरज असताना काहीच ठोस कारवाई होत नसल्याने समाजकंटक मोकाट आहेत. राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करीत पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करीत आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात धुळेकरांना वाटणारी चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनात सोमवारी (७ जुलै) ‘पाइंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे आमदार अग्रवाल यांनी शहरात समाजकंटकांकडून काही महिन्यांपासून होत असलेल्या चिथावणीखोर प्रकारांना पायबंद घालण्याबाबतचा प्रश्न मांडला.
आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की शहरात ३० एप्रिलला वक्फ कायद्याला विरोध करताना विनापरवानगी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडला. याच वेळी काही जिहादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी हिंदूबहुल भागांतील मंदिरांसह रहिवास भागाला लक्ष्य करत दगडफेक केली.
या प्रकरणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हाही दाखल केला. मात्र, समाजकंटकांवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. २१ मेस ख्रिश्चन मिशनरी युवर्तीकडून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात धर्मांतराबाबत भलावण करण्याचा प्रयत्न झाला.
याबाबत संबंधित युवतींवर गुन्हा दाखल होऊन अटकही झाली. मात्र, केवळ नोटीस देऊन त्यांना पुन्हा मोकळे सोडण्यात आले. २ जूनला शहरातील सतत गजबज असणाऱ्या पाचकंदील परिसरात मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांकडून हिंदू व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. हिंदूंना मारहाणीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून कुठलीच ठोस कारवाई केली जात नाही. झालीच तर थातूरमातूर कारवाई करून संशयितांना लगेच जामिनावर सोडून दिले जाते.
विशिष्ट भागांमध्येच रात्रभर वर्दळ का?
शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागांमध्ये रात्री दहा-साडेदहानंतर दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली जातात. एखाद-दुसरा धार्मिक कार्यक्रम होत असेल, तर लगेच पोलिसांचे वाहन दाखल होऊन ते बंद केले जातात. दुसरीकडे शहरातील देवपूरमधील अंदरवाली मशीद, हजारखोली, मौलवी गंज, कबीरगंज, १०० फुटी रोड, जुना वडजाई रोड, कामगारनगर, सार्वजनिक हॉस्पिटल, तिरंगा चौक आदी भागांमध्ये मात्र रात्रभर खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, ठेले, चहा, पानटपऱ्या आदी दुकाने बिनदिक्कतपणे सुरू असतात. संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची ही दुकाने बंद करण्याची हिंमत होत नाही, पोलीस प्रशासनाने अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी शहरातील सर्वच भागांतील दुकाने रात्री साडेदहानंतर बंद करावीत, गर्दी होणार नाही, यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
धुळे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर
शहरातील मोहाडी परिसरातही हिंदू बांधवांच्या वस्तीवर पिण्याचे पाणी घेऊन जाणाऱ्या टँकरवर चढून जिहादी तरुणांनी गोमांसाची पार्टी करणे, गोमांस खाऊन ते टँकरच्या पाण्यात भुंकणे, असा किळसवाणा प्रकार नुकताच घडला. शासनाने जिल्हा पोलीस प्रशासनाला असल्या प्रकारांची वेळीच दखल घेत संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.