शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल; सीसीआय केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्री

जळगाव ।  जिल्ह्यातील शेतकरी सध्या कापूस विक्रीसाठी संघर्ष करत आहेत. ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत. दिवाळीनंतर कापूस विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआय केंद्रांचा आधार घेत आहेत.

सीसीआय केंद्रांवर सध्या कापसाला ७४२१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, जो काहीसा समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या दहा हजार रुपयांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या दराच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र, वाढीव दराची शक्यता नसल्याने आता मिळेल त्या दरात कापूस विक्री करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.

या परिस्थितीमुळे जळगावच्या सीसीआय केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही शेतकऱ्यांना वाहनांमध्ये मुक्काम करावा लागत आहे, तर काही सकाळीच विक्रीसाठी येत आहेत. अशा परिस्थितीत छोटे जिनिंग उद्योगही संकटात आहेत, कारण शेतकरी अजूनही विक्रीसाठी तयार नाहीत.

शेतकऱ्यांच्या या अडचणींना सरकार आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. कापसाला चांगला दर मिळावा यासाठी योग्य धोरणे राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत.