Jalgaon Crime News: जळगाव शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ३५ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.चोरीच्या संशयावरून त्याला चौघांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. आज मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे.
घटनेची माहिती कळताच लागलीच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी लागलीच ४ संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.