Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नराधम घटनास्थळावरून फरार झाला होता. याबाबत पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्वत्र सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते. अखेर पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षे ९ महिने २५ दिवसांच्या अल्पवयीन मुलीवर देवाजी एकनाथ सोनवणे (वय ३९, रा. वाधापूर, ता. साक्री. जि. धुळे) याने २ जूनला अत्याचार केला होता. याबाबत प्राप्त तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडत्यापासून फरार झाला होता.
याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे निजामपूर पोलीस ठाण्याच्या विविध तपास पथकांनी साक्री, दहिवेल, विसरवाडी, मुल्हेर, पिंपळनेर, नवापूर, सोनगड, नंदुरबार व निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व परिसर पिंजून काढला होता तसेच आरोपी मोबाइल वापरत नसून, त्याला पकडणे क्लिष्ट झाले होते. मात्र, असे असतानाही स्थानिक नागरिकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचे वर्णन व छायाचित्र प्रसारित करीत माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांकडून व पोलीसपाटलांकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपीचा छडा लावून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. गुन्ह्यात देवाजी एकनाथ सोनवणे (वय ३९, रा. वाघापूर, ता. साक्री, जि. धुळे) यास अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनात निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड, मधुकर सोमोसे, यशवंत भामरे, हवालदार नारायण माळचे, प्रदीपकुमार आखाडे, प्रशांत ठाकूर, सुनील अहिरे, राकेश महाले, दीपक महाले, पृथ्वीराज शिंदे, गौतम अहिरे, सागर कांगणे, परमेश्वर चव्हाण, कृष्णा भिल, सागर थाटशिंगारे आदींच्या पथकाने केली.