Crime News : भुसावळात पावणेचार लाखांचे बनावट इन्डोफिल जप्त, एका संशयिताला अटक

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील जिजाबाई हायस्कूलसम ोरील एका घरात बनावट इन्डोफिल एम- ४५ (बुरशी नाशक) तयार करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेसह स्थानिक पंचायत समिती प्रशासनाला माहिती कळवल्यानंतर स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता छापेमारी करीत तीन लाख ७८ हजार रुपये किंमतीचे बनावट इन्डोफिल जप्त करण्यात आले. संशयीताच्या घरातून पांढऱ्या सिमेंटसारख्या दिसणाऱ्या पावडरच्या तब्बल दहा गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अरुण रामगोपाल बेंडूते (५५, वाल्मीक नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गोपनीय माहितीवरून कारवाई

भुसावळात गेल्या सहा म हिन्यांपासून बनावट इन्डोफिलची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर कंपनीने पाळत ठेवून खातरजमा केली व पंचायत समिती व जळगाव जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. बुधवारी दुपारी भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी चर्चा केल्यानंतर तीन पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित घरात छापा टाकण्यात आला. यावेळी गुजरात पेंट लिहिलेल्या दहा गोण्यातून इन्डोफिल एम- ४५ लिहिलेल्या पाकिटात पांढऱ्या रंगाच्या सिमेंटसारखी दिसणारी पावडर भरण्याचे काम सुरू होते.

तीन लाख ७८ हजारांचा साठा जप्त

पथकाने गुजरात पेंट लिहिलेल्या पांढऱ्या रंगाचा पदार्थ असलेल्या दहा गोण्या जप्त केल्या आहेत. साधारण एक हजार बनावट पाकिट इन्डोफिलची पाकिटे जप्त करण्यात आली असून एका पाकिटाची किंमत ३७८ रुपये असल्याने सुमारे तीन लाख ७८ हजारांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी विजय पवार, जळगावचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बोरसे, भुसावळ पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप धांडे यांनी बाजारपेठ पोलिसांच्या सहकार्याने केले. दरम्यान, याप्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलिसांनी पाळेमुळे खोदून संशयीतांना समोर आणण्याची अपेक्षा आहे

काय आहे इन्डोफिल ?

इन्डोफिल एम- ४५ हे फफूंदनाशक (बुरशीनाशक) असून शेतकऱ्यांकडून त्यांचा मोठ्या प्रमाणावर कांदा व उसावर फवारणीसाठी वापर केला जातो. इंडोफिल एम-४५ हे डाय थायोकार्बमेट ग्रुपचे स्पर्शजन्य बुरशीनाशक असून ते बुरशीची वाढ आणि रोगांचा प्रसार थांबवते.

कृषी विभाग, पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे?

वर्दळीच्या जामनेर रोड भागातील एका घरात बनावट इन्डोफिलचे पॅकींगचा कारखाना गेल्या सहा महिन्यांपासून बिनदिक्कतपणे सुरू असताना स्थानिक पंचायत समितीचा कृषी विभाग, पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.