Crime News : गुटख्याची तस्करी करणारा परप्रांतीय चालक जाळ्यात

भुसावळ / शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत गुटख्याची तस्करी रोखत तब्बल ४० लाख ३२ हजारांचा गुटखा जप्त करीत परप्रांतीय चालकाला अटक केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. याप्रकरणी संशयित विकास हरी बदोले (२५, नयानगर कॉलनी, वॉर्ड २०, ग्रीड के पास, बालसमूद, ता. खसरावद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुटख्यासह ट्रक मिळून ५० लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंदूर येथून हा गुटखा सोलापूर येथे जात असल्याची माहिती आहे.

शिरपूर तालुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. शुक्रवार, १५ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हाडाखेडजवळील सुळे फाट्याजवळ संशयित ट्रक (क्रमांक डी.डी.०१ एम. ९२४२) आल्यानंतर त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन दामटल्याने पथकाने पाठलाग करून ट्रक अडवला. त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.

फोर एक्स्पोर्ट ओन्ली आरसीबी लिहिलेला व राज्यात प्रतिबंधीत असलेला ४० लाख ३२ हजारांचा गुटखा व दहा लाख रुपयांचा ट्रक मिळून ५० लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित ट्रकचालक विकास हरी बदोले (२५, नयानगर कॉलनी, वॉर्ड २०, ग्रीड के पास, बालसमूद, ता. खसरावद) यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, मनोज कचरे, शिंदे, हवालदार राजू ढिसले, हवालदार बागुल, कॉन्स्टेबल मनोज पाटील, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल मनोज नेरकर, चालक सागर कासार आर्दीच्या पथकाने केली