---Advertisement---
---Advertisement---
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे शनिवार (२६ जुलै)च्या रात्री चोरट्यांनी एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून ७ लाख २१ हजार ९५६ रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी विलास विठ्ठल डहाके (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास डहाके हे शनिवारी (२६ जुलै)च्या रात्री त्यांच्या दुमजली इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर कुटुंबीयांसोबत झोपण्यासाठी गेले होते. यावेळी रात्री १०.३० ते रविवारी (२७ जुलै)च्या पहाटे ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी डहाके यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने लंपास केले.
खालील घराच्या दरवाजाला कडीकोयंडा व कुलूप लावले होते. परंतु, चोरट्यांनी कडीकोयंडा, कुलूप तोडून ७ लाख २१ हजार ९५६ रुपयांचा ऐवज लांबवला. त्यात सोन्याची गठण, कानातील चाफे, गहू मणी, दोन अंगठ्या, पेंडॉल, कानातील बाळ्या, चपला हार, दोन काप, चार बाळ्या, सोन्याचा हार, कानातील सुवर्ण साखळ्या, अंगठी, चांदीच्या पाटल्या, कडे, बिचवे, बदामी अंगठी या मुद्देमालाचा समावेश होता.
डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासासाठी गुन्हे शोध शाखेची मदत घेण्यात येत आहे. पण, तपास जैसे थे आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.