कासोदा : व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा अवैध वापर सर्रासपणे करण्यात येत आहे. याशिवाय गॅसवरील वाहनांमध्ये देखील घरगुती सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा गंभीर प्रकार घडत आहेत. याच प्रकारातून अपघात होऊन जळगाव येथे एकाच कुटुंबातील १० जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. अशाच प्रकारे घरगुती सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्या एकाला कासोदा पोलिसांनी १२ हजाराच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे.
कासोदा पोलीसांना घरगुती सिलेंडरचा गॅस अवैधरीत्या वाहनांमध्ये भरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी पांडे गल्लीतील अरुण जगन्नाथ चिंचोले(६०) यांच्या घराची ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या घरातून इंडियन गॅस कंपनीचे अनाधिकृत चार गॅस सिलेंडर व गाडीत गॅस भरण्याची मोटर, नळ्या व इतर साहित्य एकूण १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मानवी जीवन धोक्यातील अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहोचण्यात संभव धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील घरगुती वापराच्या एलपीजी इंडियन कंपनीच्या गॅस सिलेंडरच्या साह्याने गॅस सिलेंडर हा गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून देण्याचे उद्देशाने बागळल्याचे आढळून आले. या गुन्ह्याची कासोदा पोलिसात नोंद करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ. श्रीकांत गायकवाड हे करीत आहेत. कारवाई ही नुकत्याच जळगाव येथील इच्छादेवी पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर ओमनी गाडीत गॅस भरतांना स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील दहा जण जखमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमधून सुरु आहे.