धुळे : चोपडा येथून धुळ्यामार्गे पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्समधील तीन तरुणांकडे शस्त्र असल्याची माहिती धुळ्यातील मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर बस अडवून तीन तरुणांना अटक करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्टल व दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
कुविख्यात आरोपींविरुद्ध गुन्हे
कुणाल बाळू गाडे (२२, साकोरे, ता. आंबेगाव, जि. पुणे), महेश सीताराम देवकर (१९, धोबी मंचर, ता. आंबेगाव, जि.पुणे) व दीपक राजू मोहिते (२९, आंबी खालसा, घारगाव, ता. संगमनेर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. मोहाडी हद्दीत बस (एमच १९, सीवाय ८६६६) आल्यानंतर सीट क्रमांक २७, २९ वरून तिघा संशयितांना अटक करण्यात आली. गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयित देवकरविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात, तर दीपक मोहितेविरुद्ध धारगाव, नगर येथे गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक नितीन करंडे, चालक हवालदार मंगल पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.