Crime News : पाठलाग करून नशिराबाद पोलिसांनी रोखले वाहन गुटखा, पानमसाल्यासह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : गस्ती करत असताना संशयास्पद वाटलेल्या बोलेरोची नशिराबाद पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा भरलेल्या थैल्यांचा साठा आढळला. ही कारवाई गुरुवार, १४ रोजी रात्री नशिराबाद टोलनाक्यावर करण्यात आली. साकेगावकडून जळगावकडे जाणाऱ्या लेलॅण्ड कंपनीच्या एका वाहनाला पथकाने थांबण्यासाठी हात दिला. पण त्याने वाहन पळविले. त्याचा पाठलाग करून तरसोद फाट्याजवळ ते पकडण्यात आले. चालकाची चौकशी केली. वाहनाची तपासणी केली असता वाहनातून तब्बल ३२ लाख ११ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

एसएसटी इन्चार्ज नशिराबाद टोलनाका पथकाचे अधीक्षक नीलेश सोनवणे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय दोरकर, हे. कॉ. योगेश खडके, व्हिडिओग्राफर शाहबाजत शेख आदींचे पथक रात्री टोलनाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून होते. बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच १९ सीवाय ३३१७) वरील चालक वाहन घेऊन जात होता. त्याला थांबवले. पथकाने चालकाची चौकशी केली. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित तंबाखू गुटखा, सुगंधित पानमसाल्याची पाकिटे प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेली असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर साकेगावकडून अशोक लेलॅण्ड (क्रमांक एमएच १९ सीएक्स ०४३०) हे येत असताना पोलिसांनी चालकास थांबविण्यासाठी हात दिला. मात्र ताब्यातील वाहन हळू करून नंतर चालकाने जळगावच्या दिशेकडे महामार्गावरून वाहन पळविले. पोलीस व्हॅनमधून पथकाने या वाहनाचा पाठलाग करत तरसोद फाट्याजवळ त्याला रोखले. वाहनाच्या तपासणीत या गाडीमध्ये गुट्खा व पानमसाला भरलेल्या गोण्या आढळून आल्या.

विमल पानमसाला एकूण ७३ सुती पोते, त्यापैकी प्रत्येक पोत्यात १८० पाकिटे- किंमत २४ लाख ५७ हजार १८० रुपये. तंबाखू गुटखा १०० गोण्या, त्यात एका गोणीत १०० पॅकेट्स ३०, किंमत २४,०००, तंबाखू गुटखा एकूण १०० प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये एकूण १,९०० पॅकेट्स २२, किंमत ४१,८०० रुपये. बोलेरो मालवाहू वाहन किंमत चार लाख, अशोक लेलॅण्ड वाहन किंमत तीन लाख रुपये, प्रत्येकी पाच हजार किमतीचे दोन मोबाईल, किंमत दहा हजार, असा एकूण ३२,११,३८० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी नशिराबाद पोलिसांचे कौतुक केले.