Crime News : नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, संशयिताकडून सुमारे एक लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील खांडबारा येथील विजयराज गिमाराम माळी यांच्या तलावीपाडा गावाजवळील शासकीय आश्रमशाळेसमोरील गोदामातून चोरट्यांनी सोयाबीनचे कट्टे लांबविल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फ शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना १० एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सूर्या ऊर्फ सुरेश रमेश गावित (रा. सावरट, ता. नवापूर) व त्याचा मित्र आकाश जयसिंग वळवी (रा. डोकारे, ता. नवापूर) यांनी साथीदारांसमवेत चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यापैकी आकाश वळवी हा नवापूर येथे एका दुचाकी शोरूममध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईकामी रवाना केले. पथकाकडून आकाश वळवी मिळून आला. त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदार सूर्या ऊर्फ सुरेश रमेश गावित (रा. सावरट, ता. नवापूर), प्रभू होळ्या गावित (रा. उचीशेवळी, ता. नवापूर), रमेश गावित (रा. गव्हाण, ता. निझर, जि. तापी, गुजरात), सुभाष (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वळली, ता. निझर, जि. तापी, गुजरात (फरार) यांच्या सहकायनि गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने संशयितांकडून सुमारे एक लाख ८१ हजारांचा सोयाबीन, तूरडाळ आदी मुद्देमाल हस्तगत केला.
त्यात विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे उघडकीस आले. दरम्यान, सूर्या ऊर्फ सुरेश रमेश गावित व प्रभू होळ्या गावित हे दोन्ही सध्या धुळे जिल्ह्यातील गुन्ह्यात अटकेत असून, रमेश गावित व सुभाष (पूर्ण नाव माहीत नाही) हे फरार आहेत. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक नाईक मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई राजेंद्र काटके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.