भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ रायफल्ससह दोन अत्याधुनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना उडाली होती. ही चोरीची घटना १९ ते २१ दरम्यान घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास एटीएसकडून सुरु होता. यात एटीएस पथकास आरोपीस अटक करुन त्याच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
कुलूप तोडून लांबवले शस्त्र
कनिष्ठ कार्यप्रबंधक प्रदीपकुमार बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार क्वालिटी कंट्रोल रूम (प्रुफ टेस्टींग विभाग) च्या शस्त्रागाराचे कुलूप १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी तोडून त्यातील तीन लाख रुपये किंमतीच्या तीन एके ४७ तसेच पाच लाख रुपये किंमतीच्या दोन गलील रायफल लांबवल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांना तातडीने माहिती देण्यात आली. आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, गहाळ झालेल्या पाच रायफली कुठेही न आढळल्याने पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.
गँगमनच्या सतर्कतेने शस्त्र सापडले
सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी गँगमन रेल्वे रूळावर गस्त घालत असताना त्यास तीन शस्त्र रूळावर पडल्याचे दिसली. यावेळी त्यांनी अभियंत्यांना व नंतर पोलीस यंत्रणेला कळवण्यात आल्यानंतर ही बाब उघड झाली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहनिरीक्षक जनार्दन खंडेराव, उपनिरीक्षक सोनवणे, जावरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत दोन एके ४७ व एक गलील रायफल जप्त केली.
एटीएसच्या पथकाचे तपासकार्यात यश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य एटीएसचे प्रमुख व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार, नाशिक युनिटच्या एटीएस पथकाने तपास सुरू केला. रेल्वे रुळावर सापडलेल्या तीन रायफल्सनंतर उर्वरित दोन रायफल्सचा शोध घेण्यासाठी एटीएसने शिताफीने तपास केला. आरोपी लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (वय ४३, राहणार तळवेल, तालुका भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने चोरी कबूल केली असून, उर्वरित शस्त्रेही पोलिसांकडे जमा केली आहेत.
आरोपीची कबुली
तपासादरम्यान, आरोपीने चोरी गेलेल्या रायफल्स रेल्वे रुळावर टाकल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जिल्हा पोलीस करत आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या गुन्ह्याचे उलगडा करण्यास एटीएस पथकाला यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.