देहूरोड येथील गांधीनगर येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात सराईत गुन्हेगाराने पिस्तूलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त तैनात केला आहे.
मध्यस्थी करणे पडले महागात
विक्रम गुरूस्वामी रेड्डी (वय 37, रा. गांधीनगर, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नंदकिशोर रामपवित्र यादव (रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.
काय घडले नेमके?
फिर्यादी नंदकिशोर यादव यांचा भाऊ राजकुमार यांच्या मुलीचा वाढदिवस गुरुवारी (दि. 13) होता. वाढदिवसानिमित्त घरासमोर मंडप टाकण्यात आला होता. कुटुंबीय आणि पाहुणे मंडपाबाहेर उभे असताना आरोपी शाबीर समीर शेख (वय 27, रा. कोंढवा) याने तेथे येऊन नंदकिशोर यांना उद्देशून, “तू मोठी पार्टी देतो आहेस, तुला मस्ती आली आहे”, असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फैजल शेख (वय 30) याने खुर्ची फेकून मारली.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
गोळीबाराने घेतला विक्रमचा जीव
भांडण सोडवण्यासाठी राजकुमार आणि विक्रम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी रजिया समीर शेख (वय 49, रा. गांधीनगर, देहूरोड), जॉन ऊर्फ साई तेजा चित्तामल्ला (वय 28) आणि फैजल शेख यांनी दगडफेक करत परिस्थिती अधिक चिघळवली. गोंधळ पाहून विक्रम रेड्डी दुचाकीवरून निघण्याचा प्रयत्न करत असताना शाबीरने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी थेट विक्रमच्या छातीत लागली. त्यानंतर शाबीरने हवेत आणखी दोन गोळ्या झाडल्या आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
रुग्णालयात मृत्यू
विक्रम गंभीर जखमी अवस्थेत खाली कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात फिर्यादी नंदकिशोर यादव यांच्या नाकाला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत.
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी
मुख्य आरोपी शाबीर समीर शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोंढवा आणि देहूरोड पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तसेच, जॉन ऊर्फ साई तेजा चित्तामल्ला याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर गांधीनगर आणि आंबेडकरनगर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलिसांची तपासमोहीम सुरू
या हत्येप्रकरणी आरोपी रजिया समीर शेख हिला अटक करण्यात आली आहे, तर शाबीर समीर शेख, फैजल शेख आणि जॉन ऊर्फ साई तेजा चित्तामल्ला अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पोलिस पथके कार्यरत आहेत.
पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.