धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव

तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३। धुळे शहर महाराष्ट्राच्या एका टोकाला, दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाहीत, उद्योगधंदे नाहीत, बागायती शेती नाही. आदिवासी बहुल क्षेत्र या सगळ्या घटकांमुळे आर्थिकदृष्ट्‌या मागासलेले आणि त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही तसेच असावे असा एक सर्वसाधारण समज होता. त्यामुळे ते एक दुर्लक्षित, उपेक्षित गाव म्हणूनच ओळखले जात होते. या गावाला केवढी समृद्ध, वैभवशाली सांस्कृतिक परंपरा आहे, याची माहिती फार थोड्या जाणकारांना आहे.

1950 ते 60 नंतर जन्माला आलेल्यांना तर याची काहीही माहिती नाही. या एका गोष्टीची सतत खंत वाटत असल्यामुळे धुळे येथील पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, सध्या पुण्यात स्थाईक असलेले प्रा. डॉ. मुकुंद तांबे यांनी या शहराची तपशीलवार ओळख करून देण्यासाठी ‘धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव’ या पुस्तकाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्याला अनेकांनी साथ दिली आणि हे पुस्तक चार महिन्यात पूर्ण केले. ‘उत्कर्ष प्रकाशन, पुणे’तर्फे प्रकाशित झाले आणि त्याचा प्रकाशन समारंभ 28 जानेवारी 2023 ला पुण्यात झाला आणि धुळेकर लेखक आणि स्नेही यांच्यासाठी 25 मार्च 2023 रोजी कार्यक्रम झाला.

‘धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव’ या पुस्तकात धुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक अंगांविषयीचे लेख समाविष्ट आहेत. जुन्या संस्था तसेच संगीत, नाट्य, क्रीडा, सामाजिक कार्य या क्षेत्रातील कार्याचा रंजक इतिहास आहे. शिवाय धुळे शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांनी अत्यंत बहुमोल योगदान दिले आहे, अशा कर्तृत्ववान व्यक्तींचाही लेखाव्दारे परिचय करून दिला आहे.
पुस्तकाच्या प्रारंभी ‘मानाचा मुजरा’ या शीर्षकाखाली धुळे शहराचे मानबिंदू असलेल्या राजवाडे संशोधन मंदिर आणि समर्थ वाग्देवता मंदिर यावर लेख आहेत आणि या दोन्ही संस्थांचे प्रेरणास्थान असलेल्या इतिहाचार्य राजवाडे आणि नानासाहेव शंकरराव देव यांचा अभिमानास्पद परिचय करून दिलेला आहे. नानासाहेव शंकरराव देव यांनी आयुष्यभर समर्थ रामदास स्वामी यांना आपले श्रध्दास्थान मानून असंख्य मठांमधून कागदपत्रे, पोथ्या गोळा करून त्याची सुविहित रचना करून ते प्रकाशित केले आणि सत्कार्योत्तेजक सभा आणि समर्थ वाग्देवता मंदिर यांची उभारणी करून फार मोठे कार्य धुळ्यात उभे केले.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यापैकी दोन महत्वाच्या उपक्रमांसाठी ज्यांच्याकडून खातरजमा करून घेतली ते महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक हे धुळ्याचे एक भूषण. पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येेष्ठ गुरूबंधू शास्त्रीबुवा यांना आपली महफिल सुरू करण्याआधी वंदन करणे भीमसेन जोशींना आवश्यक वाटत होते याचाही उल्लेख त्यांच्या लेखात आहे.
महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाची जवाबदारी विश्र्वासाने ज्यांच्यावर सोपवली ते काकासाहेव वर्वे, सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार राम सुतार हेही धुळ्याचेच. तीन राष्ट्रपतींकडून पुरस्काराने सन्मानित झालेले भारतातील एकमेव लेखक प्रा. डॉ. एम. बी. शहा हेही धुळ्याचेच. या सर्वांविषयीचे लेख या पहिल्या विभागात आहेत. शिवाय पद्मश्री दादासाहेव घोगरे, अनेक संघटनांना आर्थिक पाठबळ आणि विचारांचे भरभक्कम अधिष्ठान देणारे प्रा. डॉ. जगन्नाथ वाणी यांच्यावरही या पुस्तकात लेख आहेत.
धार्मिक विभागात नारायण बुवांची समाधी आणि विठ्ठल मंदिराची निर्मिती यावरील लेख आहेत. शतकाहून अधिक जुन्या असलेल्या गरूड वाचनालय आणि वनिता समाज यांच्यावरील लेख आहेत. धुळे शहरातील नाट्य चळवळ, त्यातील रंगार्तचा सहभाग, अहिराणी भाषेचा संपन्न वारसा जपण्यासाठी विश्राम विरारी यांनी केलेले प्रयत्न याचाही उल्लेख आहे. सामाजिक न्याय आणि सामाजिक चळवळ यासाठी धुळ्यातील एन.डी. सूर्यवंशी यांचे कार्य किती मोलाचे होते हे त्यांच्यावरील लेखातून स्पष्ट होईल.
नानासाहेब देशपांडे, एन. के. पाटील, माजी कुलगुरू के. बी. पाटील, दावके यांनी अनेक दशके धुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात जी भर घातली त्यावरील लेख या पुस्तकात आहेत.
अत्याधुनिक अशा आर्टिफिशीयल इंटेलिजन्स या क्षेत्रात जगातील अनेक देशातील मोठमोठ्या संस्थांना मार्गदर्शन करणारे वीरेंद्र भावसार हेही धुळ्याचेच, तर तुलनेने कमी वयात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस्‌चे अखिल भारतीय अध्यक्ष होण्याचा मान मिळण्याबरोबरच अनेक आशियाई आणि जागतिक संस्थांना ज्यांचे मार्गदर्शन लाभते ते चार्टर्ड अकाऊंटंट प्रफुल्ल छाजेड हेही धुळ्याचेच. त्यांच्यावरील लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत.

प्रा. डॉ. मुकुंद तांबे
९४२३४९५७५०