जळगाव : जिल्ह्यात यावेळी मान्सूनकाळात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्याना याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला असून शेतपिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. तर वीज पडून आणि पुरामुळे जीवीत हानीची नोंद प्रशासनस्तरावर झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात अती पावसामुळे ६ तालुक्यातील १८१ गावांना फटका बसला आहे. यात ६४ हजार ६२२ शेतकरी बाधीत झाले असून ५७हजार ४३० हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
सहा तालुक्यात ६४ हजार ६२२ शेतकरी बाधीत यावल तालुक्यात २ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे एका गावातील ३ शेतकरी बाधीत असून केळी व ज्वारी असे ३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले रोजी पावसामुळे ३ गावांमधील ३ हेक्टर केळी पिकधारक ६ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यात ३२ गावातील ७हजार ५०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात ३२४५ हेक्टर कापूस, ६१ हेक्टर तूर, २०७ हेक्टर सोयाबीन, १२ हे. ज्वारी, ४९४ हे. मका, १४७ हे. केळी असे ४हजार १६६ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
चोपडा तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात ६ गावातील ८५ शेतकरी बाधीत आहेत. यात २६ हे. मका, ३१ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान १२९ गावांमधील ५६ हजार ५१२ शेतकरी बाधीत झाले आहेत. यात ४६हजार ८१२ हे. कापूस, ५५३ हे. ज्वारी, तर ५ हजार १३३ हेक्टर मका असे ५२ हजार ९५८ हेक्टर नुकसान झाले आहे. तसेच बोदवड तालुक्यात १३ रोजी झालेल्या पावसामुळे १० गावातील ५१६ शेतकऱ्यांचे २४३ हेक्टर कापूस पिकाच्या नुकसानीची पंचनामा नोंद करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी म्हटले आहे.
वीज व पुरामुळे जीवित हानी
अतीपावसामुळे नदी नाल्याला पूर येवून तसेच वीज पडून जीवीत हानी झाली आहे. यात पाचोरा तालुक्यात टाकळी बुद्रुक येथील गडद नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात टूनटून राजेंद्र सहानी हि व्यक्ती वाहून गेली. तर चोपडा तालुक्यात लोणी येथे शिवाजी चैत्राम कोळी यांचा खर्डी येथे शेतात काम करीत असताना वीज पडल्याने मृत्यू झाला. तसेच चाळीसगाव तालुक्यात पातोंडी येथे गायत्री सुभाष माळी शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल नोंद तालुका प्रशासनाकडे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी म्हटले आहे.