तरुण भारत लाईव्ह न्युज मोलगी, ता. अक्कलकुवा : मागील आठवड्यात मोलगीचा निंबीपाडा, ता. अक्कलकुवा येथे उमटी येथील भीमसिंग तडवी या युवकाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. परंतु हा अपघात नसल्याचे सांगत सखोल चौकशी करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उमटी येथील भीमसिंग गोरजी तडवी (३८) हा युवक २५ डिसेंबर रोजी मोलगी येथे बाजार तथा खासगी कामानिमित्त गेला होता. त्याचा काही सामान खासगी प्रवासी वाहनाने पाठवून तो त्याच्या दुचाकीने मोलगीहूून गावाकडे परतला होता. परंतु तो निंबीपाडा, ता. अक्कलकुवा येथील पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंदही पोलिसात करण्यात आली. या घटनेप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे म्हणत त्यांनी सखोल चौकशीची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.
घटनास्थळावरील परिस्थितीनुसार भीमसिंग तडवीचा हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या तुलनेत दुचाकी व मृतदेह रस्त्यापासून खूप लांब फेकले गेले असते परंतु दुचाकी व मृतदेह रस्त्यावरच पडून राहिल्याने संशयात भर पडली होती, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मयताचे वडील गोरजी ओल्या तडवी, मयताचा भाऊ राजेंद्र गोरजी तडवी, कालूसिंग तडवी, मामा भिका दामजा वसावे (मामा) व काकड्या जुन्या वसावे यांच्या सह्या आहेत.